Ad will apear here
Next
मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवणारी संस्था - आशादीप
आशादीप संस्थेतील दिवाळीचे संग्रहित छायाचित्र

रत्नागिरीतील आशादीप संस्था मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवण्याचे कार्य गेल्या १५ वर्षांपासून करत आहे. दिवाळीच्या निमित्ताने, या संस्थेच्या कार्याची ओळख करून देणारा, संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांनी लिहिलेला हा लेख... 
........
मतिमंद मुलांना समाजात पाहिजे तेवढे स्थान मिळत नाही. आई-वडील म्हातारे होत जातात. भावंडांना आपापले व्याप असतात. मग या मुलांचे संगोपन करायचे कोणी? प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल प्रियच असते. माझा स्वतःचा मुलगा मतिमंद आहे. या मुलाचे काय होणार, या विचाराने मी हवालदिल झालो होतो; मात्र मी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्याच समदु:खी पालकांचा मी ग्रुप तयार केला आणि मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळणारी ‘आशादीप’ ही संस्था रत्नागिरीत उभी राहिली. 

संस्थेत सर्व सण अगदी गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. मुलांना घरची आठवण येऊ नये किंवा त्यांच्या सेवेत काही कमी पडू नये, यासाठी संस्थेतील ११ कर्मचारी अविरत प्रयत्न करत असतात. सेवाभावी वृत्तीचे हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करतात.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा सर्वत्र करोना थैमान घालत आहे; पण याही परिस्थितीत मुलांची एवढी काळजी घेतली गेली, की लॉकडाउनच्या सात महिन्यांत एकाही मुलाला कोणतेही आजारपण आले नाही. जे-जे खबरदारीचे उपाय योजले पाहिजेत, ते सर्व पाळून संस्थेतील २७ मुलांना आम्ही अगदी सुरक्षित व सुखरूप ठेवले आहे. 

मुलांना काही तरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने छोटे स्वयंरोजगार केंद्रही सुरू केले आहे. त्यामुळे मुले काम करतात आणि त्याचा मोबदला त्यांच्या नावे बँकेत जमा केला जातो. वर्तमानपत्रांपासून पेपर बॅग, कागदी फुले, हिराचे झाडू, पणत्या, उटणे तयार करणे इत्यादी उपक्रम मुलांमार्फत करून घेतले जातात. 

इथल्या मुलांना दिवाळीच्या दिवशी सुवासिक तेल, उटणे लावून अंघोळ घातली जाते. फराळ दिला जातो. मुले फटाकेही फोडतात; पण हे सर्व करताना त्यांना काही इजा होणार नाही, याचीही काळजी घेतली जाते. 

आशादीप संस्था विनाअनुदानित तत्त्वावर काम करते. कोणतेही शासकीय अनुदान संस्थेला मिळत नाही. सध्या जगभर करोना या आजाराने थैमान घातले आहे. सर्वच जण आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. परंतु अशाही परिस्थितीत सामाजिक जाणिवेचे भान असणारे मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. 
 
समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था पुढे येऊन संस्थेला मदतीचा हात देत असल्यामुळेच संस्थेचे काम अविरतपणे सुरू आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो तो कै. आशुतोष मुळे यांचा. त्यांच्या सहकार्यामुळेच फिनोलेक्स कंपनी गेली चार वर्षे संस्थेला दरमहा लागणारा बराचसा जिन्नस देत आहे. 

‘आ. सा. मि. सा.’ (आपण सारे मिळून सांभाळू) अशी दत्तक पालक योजनाही संस्थेने सुरू केली आहे. तिलाही समाजाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण आपले वाढदिवस घरी साजरे न करता संस्थेतील मुलांबरोबर साजरे करण्यासाठी येथे येतात. 

संस्थेची इमारत जुनी झाली आहे व आता नवीन इमारत बांधून मुलांना अधिक सुखसोयी देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी निधी संकलनाचे कार्यही सुरू आहे. कोणी आपले किंवा आपल्या नातेवाईकांचे नाव एखाद्या कक्षास देऊ इच्छित असल्यास तशी व्यवस्थाही केली जाईल. भविष्यात कोकणातील कोणीही मतिमंद व्यक्ती केवळ पैशांअभावी अशा सेवेपासून वंचित राहू नये म्हणून अशा निराधार मतिमंद व्यक्तींना आधार देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. कोणी सुदृढ, निराधार गरजू व्यक्ती असेल आणि सेवाभावी वृत्तीने काम करण्याची तयारी असेल, अशा व्यक्तींनाही संस्थेत आधार दिला जाईल. 
आजारी आणि गरजू व्यक्तींना हवी असणारी वैद्यकीय उपकरणे संस्थेतर्फे अल्पशा भाड्याने दिली जातात, जेणेकरून त्यांचा आजारपणात होणारा खर्च थोडा तरी कमी होण्यास मदत मिळेल. 

१५ वर्षांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आता एका डेरेदार वृक्षात रूपांतरित होत आहे. २०१६ साली शासनाच्या कोकण भूषण पुरस्काराने संस्थेचा गौरव झाला. आपणही आपला मौल्यवान वेळ देऊन संस्थेच्या कामाची पाहणी करून आपले मार्गदर्शन देऊ शकता. आपल्या सूचना या संस्थेच्या प्रगतीसाठी नक्कीच सहायक ठरतील. 

- दिलीप रा. रेडकर 
मोबाइल : ९४२२६ ३१४१७, ८४५९३ ४८९५३

संस्थेचा पत्ता :
आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ (नोंदणीकृत)
ई-६७, एमआयडीसी, रत्नागिरी 
ई-मेल : ashadeep.ratnagiri@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AVZWCS
Similar Posts
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
माझा लंगोटीयार!!! .... गण्या त्या वेळी माझा सख्खा मित्र होता. कोकणात कायमचं राहण्यासाठी देवरूखला पहिलं पाऊल ठेवलं, त्या दिवशी पाऊस कोसळत होता. असा पाऊस आमच्या गावाला पडायचाच नाही. म्हणून मला तो आवडला. एस्टी बसस्टँडवर थांबली, तेव्हा तो कोसळत होता. मी गाडीतून उतरलो अन् स्टँडच्या शेडमध्ये धावत शिरलो, तोवर पुरता भिजलो. अंगातली
देशभक्तीचा अंगार फुलविणारा कीर्तन महोत्सव - रत्नागिरीतील ‘कीर्तनसंध्या’ कीर्तनाला साधारण किती गर्दी होऊ शकते? काही अंदाज? ५०-१००-२००... रत्नागिरीतील पाच दिवसांच्या कीर्तनसंध्या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांची कीर्तने ऐकण्यासाठी दर दिवशी सुमारे पाच हजार जणांची उपस्थिती असते! ‘कीर्तन हे देव-धर्मापुरते मर्यादित असते,’ यासह अनेक समजुती या महोत्सवाने खोट्या ठरविल्या आहेत
नात्यांची वीण घट्ट करणारी दिवाळी सगळ्या सणांमध्ये अधिक आनंद देणारा आणि नात्यांची वीण घट्ट करणारा सण म्हणजे दीपोत्सव, अर्थात दिवाळी! आसुरी शक्तींवर विजय मिळवून समाजाला स्थैर्य आणि शांती प्रदान करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि त्या विजयाचा आनंद अभ्यंगस्नान आणि गोडधोडाचं सेवन करून व्यक्त करण्यासाठी अश्विन वद्य चतुर्दशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language